दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये हातगाडी व्यावसायिकांद्वारे रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याने व्यापारी आणि नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, यंदा महापालिकेने कडक निर्णय घेत मुख्य बाजारपेठांमध्ये हातगाडी व्यावसायिकांना प्रवेशबंदी लागू केली आहे.
अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी गुरुवारी (दि. १७) व्यापाऱ्यांसोबत बैठक घेत ही माहिती दिली. सिटी चौक ते शहागंज आणि पैठणगेट ते गुलमंडी मार्गे रंगारगल्ली या परिसरात अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांवर ५ हजार रुपयांचा दंड आणि गाड्या जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने गुलमंडी, पैठणगेट, सिटी चौक आणि औरंगपुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली आहे. मात्र, या भागातील रस्ते हातगाड्यांनी व्यापल्याने वाहतूक कोंडी होत आहे. व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांनाही रोजच्या व्यवहारात अडचणी येत आहेत.
दरवर्षी बाजारातील व्यापारी हातगाड्यांमुळे होणाऱ्या अडथळ्यांविरोधात महापालिकेकडे तक्रारी करतात, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. यंदा महापालिकेने दिवाळीपूर्वीच हातगाड्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक मोकळी ठेवण्यासाठी हातगाड्यांवर निर्बंध लावले जाणार असून, नियम तोडणाऱ्यांच्या गाड्या आणि सामान जप्त करण्यात येईल.
महापालिकेच्या या कठोर निर्णयामुळे बाजारातील वाहतूक सुरळीत होईल आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*