पैठण : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या चार बालकांना गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला असून दोघांना वाचविण्यात यश आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पैठण शहरातील रंगारहाटीत विष्णू महाराज गायकवाड यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत अनेक मुले शिक्षण घेत असतात. या संस्थेत दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षण देण्यात येते. याच संस्थेत चैतन्य अंकुश बदर (इयत्ता ८ वी) आणि भोलेनाथ कैलास पवळे (इयत्ता ५ वी) शिक्षण घेत होते. काल (२० मार्च) रोजी सकाळच्या सुमारास हे दोघे मित्र अर्जुन राजुरकर आणि करण तुपे यांच्यासोबत गोदावरी नदीत स्नानासाठी गेले.
स्नान करत असताना नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चारही मुले गटांगळ्या खाऊ लागली. यावेळी जवळ उपस्थित असलेल्या वारकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्यापैकी दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, चैतन्य बदर आणि भोलेनाथ पवळे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. गोदावरी नदीपात्रात अशा दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*