छत्रपती संभाजीनगर: हडको एन १२ परिसरातील हिंगलाज माता मंदिरात मध्यरात्री मोठ्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोकड लंपास केली. तसेच, मूर्ती उचलून नेण्याचाही प्रयत्न केला, मात्र ती जड असल्याने तो प्रयत्न अपयशी ठरला.
चोरट्यांनी देवीचे पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, कंबरपट्टा, जोडवे, त्रिशूल, भाला, तलवार, गदा आणि चक्र चोरून नेले. त्यानंतर मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे १० ते १५ हजार रुपयांची रोकड चोरली.
मध्यरात्री चोरीचा प्रकार
हा प्रकार आज, २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. मंदिरातील चोरीची माहिती सकाळी उघडकीस आली. टीव्ही सेंटर ते जिल्हाधिकारी रोडवरील हे मंदिर भाविकांसाठी नेहमी गजबजलेले असते.
पोलिस तपास सुरू
चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत श्वानपथकाला पाचारण केले, मात्र चोरट्यांचा माग काढण्यात श्वानांना यश आले नाही. आता परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भाविकांमध्ये चिंता
या घटनेमुळे मंदिर परिसरातील भाविकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. “मंदिरातील सुरक्षा वाढवण्याची गरज आहे,” असे भाविकांनी सांगितले. चोरीला गेलेले दागिने आणि रोकड परत मिळावी यासाठी पोलिसांकडून लवकरात लवकर चोरट्यांना पकडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*