२०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदारसंघांमध्ये नामनिर्देशन दाखल प्रक्रिया आणि छाननी प्रक्रियेनंतर पुढील टप्प्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ३२ लाख मतदारांना निर्भय आणि निष्पक्ष मतदानाचा अनुभव मिळावा, यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्नशील असून, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, आणि माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केले.
विधानसभा निवडणुकीसाठी ३२७३ मतदान केंद्र सज्ज
जिल्ह्यात १६.६३ लाख पुरुष, १५.३९ लाख महिला आणि १४४ इतर मतदारांसह ३२ लाख २ हजार ७५१ मतदार आहेत. त्यांच्यासाठी ९ सहाय्यक केंद्रांसह एकूण ३२७३ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत, ज्यात १२९० शहरी आणि १९८३ ग्रामीण भागातील आहेत. सुरक्षित मतदानासाठी ४० केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे, तर १० केंद्रे संचारछायेत आहेत.
वयोगटानुसार मतदार संख्येचे विभाजन
विविध वयोगटांतील मतदारांची संख्याही यावेळी देण्यात आली. १८ ते १९ वयोगटातील ८४,९१४ (२.६५%) प्रथम मतदार, २० ते २९ वयोगटातील ७,०८,९०५ (२२.१३%), आणि ३०-३९ वयोगटातील ७,८५,६९७ (२४.५३%) मतदारांचा समावेश आहे.
४२५२ मतदारांसाठी गृह मतदान सुविधा
जिल्ह्यातील २७,९६४ दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ४०,५७७ मतदारांसाठी गृह मतदानाची सोय असून, त्यात ७१५ दिव्यांग आणि ३५३७ वयोवृद्ध मतदारांनी हा पर्याय निवडला आहे.
मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांचे नियोजन
जिल्ह्यात २० हजार ३१४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, १८,५०० कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ३५९ क्षेत्र अधिकारी आणि राखीव ३८ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
३९७ उमेदवारांचे ५३७ अर्ज वैध
नामनिर्देशन प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर ६१३ अर्जांपैकी ५३७ अर्ज वैध ठरले असून, ३९७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
निर्भय वातावरणासाठी १०२ फिरते पथक तैनात
आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्ह्यात १०२ फिरते सर्वेक्षण पथके, १५० स्थिर पथके, ४६ व्हिडिओ पथके आणि १३ व्हिडिओ पाहणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*