राज्यातील रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मृत्यू आणि गंभीर दुखापतींना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४५ प्रमुख शहरांमध्ये दुचाकीस्वारांसह पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपर पोलिस महासंचालक अरविंद साळवे यांनी हा आदेश जारी केला असून, वाहन कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
विनाहेल्मेटसाठी कठोर दंड आणि परवाना निलंबन
मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच, वाहन चालवण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल.
ई-चलान यंत्रणेत सुधारणा
विनाहेल्मेट कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी ई-चलान यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर स्वतंत्र कारवाई नोंदवता येईल, अशी नवीन सुविधा या यंत्रणेत समाविष्ट करण्यात आली आहे.
मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड यांसह राज्यातील ४५ शहरांमध्ये या आदेशांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अपघातांमध्ये वाढ झाल्याने घेतला निर्णय
गेल्या ५ वर्षांतील आकडेवारीनुसार, विनाहेल्मेट प्रवाशांमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू व जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे रस्ते सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांनी आता वाहन कायद्याच्या कलम १२९ व १९४ (ड) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश देत नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*