शहरातील वेदांतनगर आणि सातारा भागात मंगळवारी (दि. २६) रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
साताऱ्यात ९५ हजारांची रोकड लंपास
सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिल्कमिल्क कॉलनीत असलेल्या मराठवाडा ट्रेडर्स या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील ९५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही रोकड दिवसभरातील कमाई होती, जी दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करण्यासाठी ठेवण्यात आली होती. या प्रकरणी मोहम्मद सादेर मोहम्मद युनूस यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
वेदांतनगरमध्ये मोबाईल शॉपी व किराणा दुकान फोडले
वेदांतनगर भागात चोरट्यांनी अक्षय साहेबराव होने यांच्या साई मोबाईल शॉपीतून ४६ मोबाईल, ५० हेडफोन, २५ ब्लूटूथ स्पीकर, १० चार्जर आणि ३ हजारांची रोकड असा १ लाख १० हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरला.
याशिवाय आकाश मनमोहन अहवाल यांच्या अहसेन प्रोव्हिजन या दुकानातून चोरांनी २१ हजार २८० रुपयांचे सिगारेटचे ७ बॉक्स आणि ७ हजारांची रोकड असा २८ हजार २८० रुपयांचा ऐवज लंपास केला.
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या तिन्ही घटना एकाच रात्री घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. पोलिसांनी तपासाची गती वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*