सुनील झिंजुर्डे प्रतिनिधी/ गंगापूर: पत्नी नांदायला येत नसल्याने निराश झालेल्या युवकाने गोदावरी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना शनिवारी समोर आली आहे. सुशील मुकिंदा तायडे (वय ३५, रा. देवरी, ता. अकोट, जि. अकोला) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव असून, तो वाळूज एमआयडीसी येथे एका कंपनीत कामाला होता.
सुशील याचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. सुरुवातीला तो पत्नीसमवेत वाळूज येथे राहत होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नी माहेरी गेली, व तेव्हापासून ती पुन्हा घरी परतली नाही. या घटनेमुळे सुशील खूपच निराश होता. त्याने वडगाव कोल्हाटी येथे बहिणीकडे आश्रय घेतला होता. त्याचे मेहुणे अशोक सरकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील बुधवारी अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा खूप शोध घेतल्यानंतरही तो न सापडल्याने कुटुंबीयांनी गुरुवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली.
शनिवारी गंगापूर पोलिसांना जुने कायगाव येथील गोदावरी नदीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. गंगापूर पोलीस ठाण्याचे प्रमोद काळे, अनिरुद्ध शिंदे, आणि दत्तात्रय गुंजाळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह गोदावरी नदीतून बाहेर काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवला. यानंतर नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. सुशीलचा चुलतभाऊ राहुल तायडे याने मृतदेह सुशीलचाच असल्याचे सांगितले.
या घटनेची गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. प्राथमिक तपासानुसार, पत्नीच्या नांदायला येण्यास नकारामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक तणावातून सुशीलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक नातेसंबंधांतील ताणतणावाचे गंभीर परिणाम समोर येत असल्याचे या घटनेतून दिसून येते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*