छत्रपती संभाजीनगर: ११ महिन्यांत दामदुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सहा भामट्यांनी शहरातील २३ नागरिकांना सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२३ दरम्यान घडला.
तक्रारदार रंजनीकांत रेबाला (४७, रा. महाजननगर) यांच्या तक्रारीनुसार, २००६ ते २०१७ या काळात ते गोव्यात एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांची रजनिशकुमार सिंग (रा. चंदीगड) यांच्याशी ओळख झाली. गोव्यातील नोकरी सोडल्यानंतर रेबाला छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले आणि एका खासगी कंपनीत रुजू झाले.
ऑक्टोबर २०२० मध्ये रजनिशकुमारने रेबाला यांना फोन करून डीजीटी क्रिप्टोकरन्सी या नव्या गुंतवणूक योजनेची माहिती दिली. ११ महिन्यांत दामदुप्पट नफा मिळेल, तसेच साखळी पद्धतीने सदस्य जोडल्यास १०% अतिरिक्त नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून रेबाला यांनी ७५,००० रुपये ऑनलाईन गुंतवले.
सुरुवातीला रेबाला यांना काही नफा मिळाला. त्यामुळे त्यांनी आपल्या ओळखीच्या २३ लोकांनाही गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. रजनिशकुमार सिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी या सर्वांकडून मोठी रक्कम गोळा केली. सुरुवातीला थोड्या कालावधीत गुंतवणुकीवर नफा मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. मात्र, कोविड-१९ महामारीचे कारण देत ही योजना अचानक बंद करण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी रजनिशकुमार सिंग असून त्याला सुभाष शर्मा (हिमाचल प्रदेश), राजीव दुहान (पंचकुला, चंदीगड), निल धिमान (हिमाचल प्रदेश), विवेक शर्मा (हिमाचल प्रदेश) आणि अभिषेक शर्मा (हिमाचल प्रदेश) या पाच जणांची साथ होती.
तक्रारदार रंजनीकांत रेबाला यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
साखळी पद्धतीने सदस्य जोडून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या योजनांमुळे अनेक गुंतवणूकदार फसवले जात आहेत. सुरुवातीला थोडा नफा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवणे आणि नंतर मोठा गंडा घालणे, हा प्रकार गुन्हेगारी टोळ्यांसाठी नवा फंडा ठरत आहे.
सावधानतेचे आवाहन
या प्रकरणामुळे आर्थिक गुंतवणुकीबाबत नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनधिकृत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी खात्री करण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*