छत्रपती संभाजीनगर : शहरातील जुबली पार्क भडकल गेट परिसरामध्ये आज सकाळी एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मॉडर्न स्कूलच्या परिसरात मोकाट सुटलेल्या एका रेड्याने घुसखोरी केली. या घटनेने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची एकच तारांबळ उडाली.
आज सकाळी शाळेच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थी बाहेर आले असता अचानक हा मोकाट रेडा शाळेच्या गेटमधून आत घुसला. त्यापूर्वी, रेड्याने बाहेर दोन ते तीन नागरिकांना धडक दिली होती. शाळेच्या गेटवर असलेल्या वॉचमनने रेड्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याने शाळेत प्रवेश करून काही विद्यार्थ्यांना जखमी केले.
या घटनेमुळे शाळा परिसरात गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने घाटीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, हा रेडा मोकळा का फिरत होता आणि त्याचा मालक कोण, याचा शोध सुरू आहे.
पालकांनीही या घटनेनंतर शाळेत आणि रुग्णालयात धाव घेतली. सध्या जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, या घटनेने शाळा परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तसेच, मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*