राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजना 2024 ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत थकीत वीजबिलाच्या संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्याने ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.
अभय योजना: थकबाकीदारांसाठी संधी
महावितरणने 31 मार्च 2024 पर्यंत थकीत वीजबिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी 1 सप्टेंबर 2024 पासून अभय योजना सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आला होता. मात्र, ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन 31 डिसेंबर 2024 पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. आता, ग्राहकांना अधिक संधी देण्यासाठी या योजनेचा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
सवलती आणि भरणा योजना:
योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी मूळ थकीत वीजबिलाच्या 30 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. उर्वरित 70 टक्के रक्कम सहा हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा दिली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि इतर लघुदाब ग्राहकांनी थकीत बिलाची एकरकमी रक्कम भरल्यास त्यांना 10 टक्के सवलत मिळेल, तर उच्चदाब औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना 5 टक्के सवलत आहे.
योजनेचा आतापर्यंतचा परिणाम:
राज्यातील 93,848 वीज ग्राहकांनी आतापर्यंत अभय योजनेचा लाभ घेतला असून, यामुळे महावितरणला 130 कोटी रुपयांची थकबाकी मिळाली आहे. त्याचबरोबर ग्राहकांना 57 कोटी 36 लाख रुपयांचे व्याज आणि 2 कोटी 12 लाख रुपयांचा विलंब आकार माफ करण्यात आला आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा:
31 मार्च 2025 नंतर या योजनेला आणखी मुदतवाढ देणार नसल्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, कोणत्याही जागेच्या मालक, खरेदीदार किंवा ताबेदाराने वीजबिल थकबाकी भरणे बंधनकारक आहे.
असा घ्या योजनेचा लाभ:
ग्राहकांनी www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवर किंवा महावितरणच्या मोबाईल अॅपवरून या योजनेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी 1912, 18002333435 किंवा 18002123435 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
ग्राहकांनी सवलतींचा लाभ घेत आपली थकबाकी भरून चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*