छत्रपती संभाजीनगर: रस्ताचुकून भटकत असलेल्या एका वयोवृद्ध महिलेची तिच्या कुटुंबासोबत पुनर्भेट घडवून आणण्याची संवेदनशील जबाबदारी MIDC सिडको पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली. या तात्काळ आणि प्रभावी कृतीचे शहरात कौतुक होत आहे.
गुरुवार रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास, धुत हॉस्पिटलजवळील गुरुमाऊली मेडिकलसमोर एका ७० वर्षीय महिलेची रस्त्यावर भटकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डायल ११२ पथकाने घटनास्थळी पोहोचून महिलेची सुटका केली आणि तिला पोलीस ठाण्यात आणले.
तपासादरम्यान, महिलेने आपले नाव सिताबाई नारायण क्षीरसागर, रा. बोरी, ता. वसमत, जि. हिंगोली असे सांगितले. तसेच, ती रस्ताचुकून छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचल्याचे आणि येथे तिचे कोणीही नातेवाईक नसल्याचे स्पष्ट केले. तिच्या अशक्त अवस्थेची जाणीव ठेवून महिला पोलीस अधिकारी राधा लाटे यांनी तिला खाण्यापिण्याची सोय करून सखी वन स्टॉप सेंटर, एमआयडीसी चिकलठाणा येथे तिच्या निवासाची व्यवस्था केली.
शुक्रवार रोजी, पोलिसांनी तातडीने तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचे काम हाती घेतले. सततच्या प्रयत्नांनंतर, महिलेचा मुलगा हनुमान नारायण क्षीरसागर (वय ३३) आणि सून रेणुका हनुमान क्षीरसागर (वय ३०) यांचा शोध घेण्यात यश आले. हनुमान आणि रेणुका हे मूळचे वसमत तालुक्यातील असून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.
पोलिसांनी सिताबाई यांना सन्मानाने साडी-चोळी देऊन त्यांच्या मुलगा व सुनेच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केले. आईला पुन्हा हाती मिळाल्यामुळे भावूक झालेल्या हनुमान आणि रेणुका यांनी पोलिसांचे आभार मानले. “तुमच्या मदतीशिवाय आम्हाला आमची आई परत मिळाली नसती,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
MIDC सिडको पोलिसांचे सतर्क आणि माणुसकीने प्रेरित काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*