छत्रपती संभाजीनगर : रास्त भाव दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (१४ जून) दुपारी रेल्वे स्टेशनजवळील जीएसटी भवन कार्यालयाजवळ करण्यात आली.
कांचन नामदेवराव कांबळे (वय ३४, रा. स्बी इनसिग्निया अपार्टमेंट, हमालवाडा) असे अटक करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव असून तिच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचे काटे पिंपळगाव (ता. गंगापूर) येथे रास्त भाव दुकान क्र. २९ आहे. या दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी कांबळे हिने तडजोडीत स्वत:साठी १५ हजार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी २५ हजार रुपये अशी एकूण ४० हजारांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने १२ जून रोजी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. ठरल्याप्रमाणे कांबळे हिने जीएसटी भवन परिसरात लाच स्वीकारली आणि तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे खांद्यावरचा रुमाल पिशवीत टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले.
कांबळेच्या दुचाकीच्या डिकीतून ४० हजार रुपयांची लाच सापडली. तिच्या घरावर टाकलेल्या झडतीमध्ये १ लाख २९ हजार रुपये रोख, पाच हजार रुपयांचे दागिने आणि अंदाजे १३ लाखांचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई एसीबीचे निरीक्षक वाल्मीक कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*