छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. याशिवाय चार जनावरे ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दुपारी दोनच्या सुमारास मोढा बुद्रूक येथे शेतातून घरी जात असलेल्या रंजना बापू शिंदे यांच्यावर वीज कोसळली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दुसरी दु:खद घटना सारोळा येथे घडली. येथे पेरणीसाठी शेतात गेलेले दोन सख्खे भाऊ – रोहित राजू काकडे आणि यश राजू काकडे – वीज कोसळून मृत्युमुखी पडले. या दोघांच्याही मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
पिंपळदरी येथे दुपारी तीन वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. शेतातील पत्र्याच्या शेडलगत उभ्या असलेल्या शिवराज सतीश गव्हाणे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ जीवन सतीश गव्हाणे (वय 20) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिल्लोडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खातखेडा येथे शेतात काम करणारा विशाल ज्ञानेश्वर शिंदे (वय 20) वीज कोसळून जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अन्वी शिवारातील नारायण सांडू बांबर्डे यांच्या शेतात वीज कोसळून एक म्हैस ठार झाली. तसेच मांडणा येथील ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या शेतात तीन वासरे मृत्युमुखी पडली.
या दुर्घटनांनी संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*