छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-४ सिडको परिसरात एका घरात घडलेल्या धाडसी घरफोडीमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घराच्या भोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा फिरवून चोरट्यांनी घरात प्रवेश करत सुमारे ८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ६२ हजार रुपये रोख लंपास केले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रितेश देवेंद्रन (रा. एन-४, सिडको) यांच्या घरात घरफोडी झाली आहे. ते मूळ मुंबईचे असून सध्या एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते ॲड. विशाल बागल यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहत होते. दिनांक ५ जून रोजी ते मुंबईला गेले होते.
९ जून रोजी त्यांनी आपल्या मोबाईलवरून घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, कॅमेऱ्यांची दिशा बदललेली आढळून आली. त्यांनी तात्काळ घरमालक विशाल बागल यांना संपर्क करून या बाबत माहिती दिली. घरात चोरी झाल्याचा अंदाज येताच पोलिसांना कळवण्यात आले.
११ जून रोजी रितेश देवेंद्रन शहरात परतल्यानंतर चोरीचा पूर्ण तपशील उघड झाला. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. घरातील ८ तोळे सोन्याचे दागिने आणि ६२ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कन्हाळे करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*