छत्रपती संभाजीनगर : केवळ चार लाख रुपयांत तीन कोटी रुपयांचा नोटांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोण्याचा गूढ खेळ रंगवला जात होता. शहरातील प्रसिद्ध हॉटेल रविराजच्या खोलीत गंडेदोरे, हारतुरे, ओले-सुके नारळ, कवड्या, जडीबुटी यांची मांडणी करून अंधश्रद्धेवर आधारित ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे प्रयोग सुरू होते. मात्र, गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. गुरुवारी (१३ जून) रात्री पोलिसांनी छापा टाकून तिघांना रंगेहाथ अटक केली.
गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हॉटेल रविराजच्या खोली क्रमांक ३१० व ३१४ मध्ये संशयास्पद हालचाली सुरू होत्या. सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांच्या पथकाने रात्री सातच्या सुमारास छापा टाकून तिघांना अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये विकास प्रकाश उत्तरवार (४२, रा. हिमायतनगर, नांदेड), विलास देवराव कुहिले (४२, रा. जरूळ, वैजापूर), व शंकर बबन काजळे (३६, रा. चिकलठाणा) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खोलीत विविध जादूटोण्याचे साहित्य सापडले. त्यामध्ये काळी पावडर, मंत्र लिहिलेले कागद, काळे-लाल कापड, शेंदूर लावलेल्या पुड्या, कवड्या, वाळलेले लिंबू, हारतुरे यांचा समावेश होता. आरोपींचा हेतू चार लाख रुपये घेऊन तीन कोटी रुपयांचा ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचा होता.
मुख्य आरोपी विकास उत्तरवार याच्या जवळून कोट्यवधींचे धनादेश जप्त करण्यात आले. तो पूर्वी उद्योजक होता, मात्र कोरोनानंतर आर्थिक अडचणीत सापडला होता. सध्या तो जमीन व्यवहारात गुंतलेला असून डिसेंबर २०२४ पासून तो हॉटेलमध्येच राहत होता.
गुन्हे शाखेने तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*