छत्रपती संभाजीनगर: करमाड येथील डीएमआयसीजवळील लाडसावंगी रोडवर लहुकी फाट्याजवळ गुरुवारी (दि. ९) रात्री आढळलेल्या ३५ वर्षीय महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून, तो मृतदेह सुनीता कृष्णा घनघाव (रा. झाल्टा, ह. मु, मुकुंदवाडी) यांचा असल्याचे समोर आले आहे. सुनीताचा खून करून फरार झालेला आरोपी रावसाहेब तान्हाजी ओळेकर (२५, रा. तळणी, ता. बदनापूर, ह.मु, शेंद्रा) याने बदनापूर शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
चार वर्षांपूर्वी रावसाहेब व सुनीताचे अनैतिक संबंध होते. सुनीता हिने रावसाहेबकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता, परंतु रावसाहेब लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. यावरून सुनीताने दीड वर्षांपूर्वी रावसाहेबविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर रावसाहेब पुन्हा सुनीताशी जवळीक साधू लागला. काही कालावधीनंतर, दोघांनी सातारा परिसरातील एका मंदिरात लग्न केले, मात्र सुनीता घरी न जाण्याबद्दल नाराज होती.
सुनीताला तीन मुले असल्याने त्यांची काळजी घेण्याबद्दलही त्यांच्यात वाद होत होते. विशेष म्हणजे, रावसाहेबने एक वर्षापूर्वी नात्यातील एका मुलीसोबत लग्न केले होते, हे समजल्यावर दोघांच्यात आणखी वाद वाढला. बुधवारी (दि. ८) सायंकाळी रावसाहेब कार घेऊन सुनीताच्या घरात गेला. सुनीताने त्याला आग्रह धरला की, “तुझ्या घरी नांदायला घेऊन चल.” त्यावर रावसाहेबने तीव्र प्रतिक्रिया दिली आणि सुनीतेला सांगितले की, “जोपर्यंत तू बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाहीस, तोपर्यंत मी तुला घरी घेऊन जाणार नाही.” यावर दोघांमध्ये भांडण झाले.
त्याच रात्री, रावसाहेब सुनीताला कारमध्ये घेऊन शेंद्रा येथील त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याने सुनीतेला सांगितले की, “तू दवाखान्याची फाईल आणि मोबाइल घेऊन चल.” त्यानंतर दोघेही कारमध्ये निघाले, परंतु सुनीता घरात परत न आल्यानंतर तिच्या मुलीने फोन केला, पण सुनीतेचा मोबाइल बंद होता. काही तासांनी, सुनीता लहुकी फाट्याजवळ मृत अवस्थेत आढळली.
पोलिस तपास सुरू
करमाड पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनकर तपास करत आहेत. सुनीतेच्या खूनाच्या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, रावसाहेबच्या आत्महत्येची देखील पडताळणी केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*