छत्रपती संभाजीनगर : काल (११ जून) सायंकाळी शहरातील सिद्धार्थ उद्यानात वादळाच्या वेळी मुख्य प्रवेशद्वार कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मनपाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घोषणा महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी केली आहे.
ही घटना संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास घडली. त्या वेळी वादळी वारे ताशी ८० किमी वेगाने वाहत होते. अचानक उद्यानाचे सिमेंटचे प्रवेशद्वार पर्यटकांच्या अंगावर कोसळले. या घटनेत स्वाती अमोल खैरनार (३७) आणि रेखा हरिभाऊ गायकवाड (६५) यांचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता.
घटनास्थळी भेट दिल्यानंतर आयुक्त श्रीकांत यांनी सांगितले की, “उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम बीओटी (Build Operate Transfer) तत्वावर खासगी ठेकेदाराकडे होते. देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असून, प्राथमिक तपासणीत त्याचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.”
याशिवाय, दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
या दुर्घटनेनंतर सात दिवसांसाठी सिद्धार्थ उद्यान बंद ठेवण्यात आले असून, स्ट्रक्चरल ऑडिटसह इतर बीओटी तत्वावरील कामांची देखील पाहणी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*