छत्रपती संभाजीनगर : पोलिस वेळेवर येत नाहीत, असे नेहमी बोलले जाणारे वाक्य डायल ११२ या उपक्रमामुळे खोटे ठरत आहे. संकटात असलेल्या नागरिकांसाठी तत्परता दाखवत, या विशेष सेवेद्वारे शहरी आणि ग्रामीण भागात वेगाने मदत पोहोचवली जात आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झालेल्या डायल ११२ या राज्यव्यापी हेल्पलाइनला मिळालेला प्रतिसाद सकारात्मक आहे. या सेवेमुळे २०२४ मध्ये शहरातून ५०,२६६ कॉल नोंदवले गेले, त्यापैकी ४२,८१६ कॉलला वेळेत प्रतिसाद दिला गेला. ग्रामीण भागात १६,९६१ कॉल नोंदवले गेले, त्यापैकी बहुतांश प्रकरणांत ५.३२ मिनिटांचा रिस्पॉन्स टाइम राखण्यात यश आले.
कुठे कौटुंबिक छळ, कुठे अपघात, तर कुठे महामार्गावर वाहन बंद पडल्यासारखी संकटे समोर आली. २४x७ कार्यरत असलेल्या या सेवेसाठी जिल्हा पोलिसांकडे २५ चारचाकी आणि ९८ दुचाकी वाहने आहेत. कॉल झाल्यानंतर शहरात १० मिनिटांत, तर ग्रामीण भागात १५ मिनिटांत मदत पोहोचवणे उद्दिष्ट ठेवलं आहे.
डायल ११२ सेवा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. बिग डेटा अॅनालिटीक्स आणि जीपीएस प्रणालीद्वारे राज्यभरातील पोलिस नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी यांच्या मते, खोटे किंवा विनाकारण कॉल करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जातो, यामुळे सेवेमध्ये अडथळा येत नाही.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील सेवेत सुधारणा होऊन राज्यात दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा पोलिसांनी स्थान मिळवले आहे. डायल ११२ सेवा म्हणजे नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आधार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*