छत्रपती संभाजीनगर: सिडको परिसरातील अर्बन मेडीकल दुकान फोडून अज्ञात चोरट्याने 12 हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल लंपास केला आहे. दुकानाचे मालक मनोहर सोपान कोरे (वय 58, रा. एन-9 सिडको, रायगडनगर) यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी (11 जानेवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास कोरे यांनी घराच्या खालच्या मजल्यावरील मेडीकल दुकान बंद करून झोपी गेले. रविवारी (12 जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे ऑटोरिक्षाचालक नंदू भिंगारे यांनी त्यांना आवाज देऊन बाहेर बोलावले. “तुमच्या मेडीकलचे शटर उघडलेले आहे,” असे सांगितल्यावर कोरे खाली आले.
त्यांनी दुकानात पाहणी केली असता, टेबलच्या ड्रॉवरमधील 12 हजार रुपये रोख रक्कम आणि मोटोरोला कंपनीचा मोबाईल हँडसेट चोरट्यांनी चोरल्याचे दिसून आले. कोरे यांनी तत्काळ सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार भारती गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*