छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात नायलॉन मांजाने गळा चिरल्याने एका पोलिस उपनिरीक्षक जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१४ जानेवारी) सकाळी घडली. गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
जखमी पोलिस उपनिरीक्षक दीपक पारधे हे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असून सुधाकर नगर, सातारा येथे राहतात. ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने जात असताना अचानक गळ्यात नायलॉन मांजा अडकला. मांजा गळ्याला अडकल्याने त्यांच्या गळ्यावर गंभीर जखम झाली. रक्तस्त्राव होऊन ते जागीच बेशुद्ध झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी घेतली तत्काळ दखल
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी रुग्णालयात भेट देऊन दीपक पारधे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
नायलॉन मांजावर कठोर कारवाईचे आदेश
नायलॉन मांजामुळे वारंवार अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी यावर त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी देखील नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*