छत्रपती संभाजीनगर: नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या जखमी होण्याच्या घटनांची मालिका अद्याप थांबलेली नाही. बुधवारी पुन्हा दोन नागरिक गंभीर जखमी झाले. पहिली घटना चिकलठाणा परिसरातील मिनी घाटीजवळ सायंकाळी घडली, तर दुसरी घटना एन-४ परिसरात घडली.
मंगळवारी मकर संक्रांतीनिमित्त शहरात मोठ्या उत्साहात पतंगोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, यावेळी अनेक ठिकाणी नायलॉन मांजाचा बेजबाबदारपणे वापर झाल्यामुळे १५ हून अधिक नागरिक व लहान मुले गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
बुधवारी शेख नजीर शेख अब्दुल (५०, रा. पडेगाव) हे शेंद्रा परिसरातील काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. चिकलठाणा परिसरातील मिनी घाटीजवळ त्यांचा गळा नायलॉन मांजामुळे कापला गेला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे २५ टाके घालण्यात आले.
तर दुसऱ्या घटनेत, एन-४ परिसरातून जात असलेल्या हर्षवर्धन नामक मुलाच्या गळ्याला मांजा लागून गंभीर जखम झाली. त्यालाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असूनही, या प्रकारचा बेकायदेशीर वापर अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून प्रशासनाने यावर कठोर पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*