छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोद्यात बुधवारी चोरट्यांनी माजी सरपंच पेरे यांच्या घरात चोरी करून तब्बल १० तोळे सोने लंपास केले. चोरीचा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पेरे कुटुंब पाटोदा येथे पत्नी, दोन मुले व सुनांसह वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले होते. दुपारी सुमारे अडीच वाजता आनंद पेरे चहा नेण्यासाठी शेतातून घरी आला. यावेळी त्याला घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील १० तोळे सोन्यासह इतर काही मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपासाला गती दिली असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आदर्श गावाच्या प्रतिष्ठेला तडा गेल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*