छत्रपती संभाजीनगरातील 34 कोटी रुपये खर्चून उभारलेले वंदे मातरम् सभागृह मागील वर्षभरापासून बंद पडले आहे. सभागृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली होती. मात्र, 45 लाख रुपयांचे विज बिल थकवल्यामुळे सभागृहाला कुलूप लावण्यात आले आहे.
सिडको प्रशासनाने किलेअर्क येथे उभारलेले वंदे मातरम् सभागृह आणि शेजारील हज हाऊस या दोन्ही प्रकल्पांवर तब्बल 70-75 कोटी रुपये खर्च झाले. हज हाऊस सुरू असले तरी त्याच्या देखभालीसाठी मोठ्या समस्या येत आहेत. दुसरीकडे, वंदे मातरम् सभागृहाची अवस्था आणखी वाईट झाली आहे.
सभागृहाच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे त्याचा वापर होण्याऐवजी हे प्रकल्प निष्क्रिय बनले आहेत. मागील वर्षभरापासून सभागृह बंद असून, ध्वनिक्षेपण यंत्रणा नसणे, गळती, खुर्च्यांची कमतरता, तसेच भाडे दर अवास्तव असल्याने कोणीही ते भाड्याने घ्यायला तयार नाही.
महापालिकेने सभागृहाची जबाबदारी ताब्यात घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कार्यालयाने वीज कापल्याचीही माहिती समोर येत आहे.
वंदे मातरम् सभागृहातील ही परिस्थिती पाहता, प्रकल्पासाठी खर्च केलेला निधी व्यर्थ जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*