राज्यभरात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. तथापि, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजची पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी आजची पोलीस भरती रद्द केली आहे. जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांची शहरातील विभागीय क्रीडा संकुलावर शारीरिक चाचणी घेण्यात येणार होती. राज्यभरातून तरुण विद्यार्थी पोलीस भरतीसाठी संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. मात्र, अचानक पोलीस प्रशासनाने परीक्षेच्या ठिकाणी बोर्ड लावून परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिल्याने परीक्षार्थी संताप व्यक्त करत आहेत.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “पोलीस आयुक्तांच्या मनात आले म्हणून परीक्षा रद्द करायची का? ही काय राझाकरी आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत भरती प्रक्रिया रद्द केल्याचे सांगितले आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना 9 जुलै रोजी बोलवण्यात आले होते, परंतु तारखेत बदल करून 2 ऑगस्ट रोजी शारीरिक चाचणी ठेवण्यात आली. आज पुन्हा एकदा परीक्षा रद्द झाल्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना अनपेक्षित मनस्ताप सहन करावा लागत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kqy4OPp3LZSAiLoBGmRmIl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*