छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेला डिजिटल बोर्ड तोडल्याने गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. महेश मुरलीधर कांबळे (३२, रा. बेगमपुरा) या माथेफिरू आरोपीला पोलिसांकडून तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
आरोपी महेश कांबळे हा विद्यापीठ परिसरात चाकू घेऊन फिरत होता. बीएस्सी प्रथम वर्षात शिकणारी जयसिंगपुरा भागाकडे जाणारी एका तरुणीला चाकूचा धाक दाखवत त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने आरडाओरड करत मदत मागितली.
तणाव निर्माण आणि पोलिसांची कारवाई
घटनेनंतर संतप्त तरुणांनी आरोपीला पकडून चोप दिला. यावेळी आरोपीच्या धक्क्याने पुतळ्यासमोरील डिजिटल बोर्डमधील एक अक्षर तुटले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे आणि सहायक आयुक्त संपत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.
संघटनांचे आवाहन आणि बोर्डाची दुरुस्ती
या घटनेनंतर अफवा पसरवू नये, शांतता राखावी, असे आवाहन आंबेडकरवादी संघटनांनी केले. राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रकाश इंगळे, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे दीपक निकाळजे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अमित भुईगळ यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले.
तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून पोलिस आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने काही तासांतच तुटलेला डिजिटल बोर्ड दुरुस्त करण्यात आला आणि त्यावर पुष्पहार अर्पण करून परिसरातील तणाव शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शहरात शांतता प्रस्थापित
आता परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. शहरातील सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आणि स्थानिक संघटनांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*