छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या आश्वासनांवरच जगावे लागत आहे. प्रत्येक वेळी नवीन तारीख आणि नव्या घोषणा मिळत असताना, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस पाऊल उचलले गेले नाही. आता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, मागील अनुभव पाहता हा विश्वास सार्थ ठरणार का, याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
पाणीपुरवठ्याचे राजकारण? की विकासाचा नवा अध्याय?
शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम 90 टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, मागील पाच वर्षांत हेच दावे वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक आमदार-खासदारांनी केले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वेळोवेळी प्रशासनाला सूचना करूनही ‘तारीख पे तारीख’ मिळाली, पण शहराला नियमित पाणी मिळाले नाही. त्यामुळे या नव्या घोषणेला नागरिक कितपत गांभीर्याने घेतील, हा मोठा प्रश्न आहे.
स्थानिक नेते आणि पक्षीय भूमिका
सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या विषयावर राजकीय कुरघोडी करण्यास मागे राहिले नाहीत. शिवसेनेच्या (शिंदे गट) संजय शिरसाट यांनी केलेला दावा लोकांना दिलासा देणारा असला तरी प्रत्यक्षात मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी या योजनेच्या विलंबावर सरकारला जबाबदार धरले आहे. मनसेने तर थेट आंदोलनाचा इशारा दिला असून, “नुसत्या घोषणा नकोत, आता कृती हवी,” अशी मागणी केली आहे.
निवडणुकीपूर्वी ‘पाणीपुरवठा’ कार्ड?
मनपा निवडणुका तोंडावर आल्या असताना, या घोषणांचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मागील काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने कोट्यवधी रुपये मंजूर केले, पण काम पूर्ण का झाले नाही? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहराला खरंच पाणी मिळेल का? की पुन्हा आश्वासनांची भुलभुलैया?
एप्रिलमध्ये पाणीपुरवठा सुरू होईल असे सांगितले जात आहे, पण या आधीच्या घोषणांप्रमाणेच ही घोषणा हवेत विरते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष आहे. सरकारचा हा दावा अंमलात येतो की निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक ‘तारीख पे तारीख’ मिळते,हे पाहावे लागेल!
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*