पैठण तालुक्यातील चांगतपुरी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील एका महिला डॉक्टरने तिच्या ६ महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी घेतली. या घटनेत महिलेचा मृतदेह सापडला असला तरी बाळाचा शोध अद्याप लागलेला नाही. मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता पाटेगाव पुलावर ही घटना घडली. डॉ. पूजा प्रभाकर व्हरकटे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे.
डॉ. पूजा या ६ महिन्यांच्या बाळासह शहरातून ऑटोरिक्षामध्ये चांगतपुरीस जात होत्या. पाटेगाव पूलाजवळ येताच, त्यांनी रिक्षाचालकाला नदीचे पाणी पाहण्यासाठी रिक्षा थांबवण्याची विनंती केली. काही क्षणातच, त्या बाळासह नदीत उडी घेतल्याचे रिक्षाचालकाने पाहिले आणि आरडाओरड सुरू केली. लगेचच नागरिक घटनास्थळी जमा झाले व पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोलिस पोहोचताच त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले. माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे यांच्या मदतीने स्थानिक मच्छीमारांची मदत घेऊन तब्बल दोन तास रेस्क्यू ऑपरेशन चालले. यावेळी डॉ. पूजाचा मृतदेह सापडला, मात्र बाळाचा शोध अद्याप सुरू आहे.
डॉ. पूजा यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*