आरटीओने दंड प्रलंबित असल्यामुळे जप्त केलेली कार परत न मिळाल्याने संतापलेल्या बेरोजगार अभियंत्याने ती थेट आरटीओ कार्यालयातून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. राहुल सुनील जठार (वय २८, रा. जठार वस्ती, वैजापूर) असे या अभियंत्याचे नाव असून, वेदांतनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी राहुलची कार (एमएच ०५ बीजे १६६७) आरटीओने जप्त केली होती. तिच्यावर ३४ हजार रुपयांचा दंड प्रलंबित होता. अनेक प्रयत्न करूनही कार सोडवण्यात राहुलला अपयश आले. अखेर संतापलेल्या राहुलने रविवारी मध्यरात्री बनावट चावीच्या सहाय्याने आरटीओ कार्यालयात प्रवेश करून कार लंपास केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि चोराची अंगकाठी पाहून पोलिसांनी थेट राहुलच्या घरी धाड टाकली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने कार चोरीची कबुली दिली, मात्र कार कुठे लपवली याबाबत त्याने कोणतीही माहिती दिली नाही.
राहुलने अभियंता शिक्षण घेतले असून, काही महिन्यांपूर्वी तो पुण्यात नोकरी करत होता. सध्या तो बेरोजगार आहे आणि या परिस्थितीत त्याने हा अनपेक्षित निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे.
वेदांतनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*