स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेने हडको एन-११ परिसरातील ताठे मंगल कार्यालयाच्या जागेत तब्बल ३६ कोटी रुपये खर्चून तीन मजली भव्य इमारत उभारली आहे. या इमारतीत महापालिकेचे पहिले सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू होणार असून, त्यामुळे शहरातील रुग्णांना अद्ययावत आणि परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील, अशी माहिती महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
शहरातील घाटी रुग्णालय आणि मिनी घाटीवरील ताण कमी करण्यासाठी हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक येथील महापालिका रुग्णालयांमध्ये विविध आजारांवर उपचार केले जातात, त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकाही सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करत आहे.
पहिल्यांदा डोळ्यांचा दवाखाना, नंतर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा निर्णय
महापालिकेने पूर्वी या जागेत डोळ्यांचा दवाखाना सुरू करण्याचे ठरवले होते, मात्र तो प्रकल्प पुढे ढकलण्यात आला. आता या ठिकाणी तीन मजली सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. शहरातील हे पहिलेच महापालिकेचे अद्ययावत रुग्णालय असून, खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचीही सेवा येथे उपलब्ध असणार आहे.
मनपाचे ४५ आरोग्य केंद्र कार्यरत
शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महापालिकेने सध्या ४५ आरोग्य केंद्र सुरू केले आहेत. मात्र आता अधिक विस्तृत सेवेसाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना केली जात आहे.
उपचार सुविधा निश्चित करण्यासाठी दोन दिवसांत बैठक
या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कोणत्या आजारांवर उपचार करावेत, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे. घाटी रुग्णालयाचे आरोग्य उपसंचालक, सिव्हिल सर्जन, महापालिका आरोग्य अधिकारी यांची बैठक होऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. परस महलेचा यांनी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*