पैठण रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी येणाऱ्या अडथळ्यांमुळे शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. तीन ठिकाणी जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेने मंगळवारपासून ४८ तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रुंदीकरणासाठी जलवाहिन्यांचे स्थलांतर
पैठण रस्त्यावर गेवराई तांडा, कौडगाव-ताहेरपूर, आणि ढोरकीन या ठिकाणी १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या रस्त्याच्या कामासाठी अडथळा ठरत असल्याने स्थलांतर करणे आवश्यक झाले आहे. हे काम मंगळवारी सकाळी ९ वाजता सुरू होणार असून बुधवारी रात्रीपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रक्रियेत सहा ठिकाणी क्रॉस कनेक्शन द्यावे लागणार आहे. जलवाहिन्यांची चाचणी आणि भरण्यासाठी १२ ते १८ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपर्यंतच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
वीज वितरण शटडाऊन
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वीज वितरण कंपनीनेही १५ तासांचा शटडाऊन घेत विजेचे खांब काढण्याचे काम सुरू केले आहे. नवीन खांब बसवण्यासाठी केबल टाकण्याचे काम केले जाईल. या प्रक्रियेमुळे फारोळा जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिमी आणि १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या बंद राहतील. परिणामी, शहरातील नागरिकांना दोन दिवस पाण्याचा पुरवठा होणार नाही.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*