छत्रपती संभाजीनगर: गारखेडा येथील वेदांत बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या साडेपाच वर्षीय दैविक अविनाश आघाव या चिमुकल्याचा डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उपचारातील निष्काळजीपणामुळे आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याच्या गंभीर आरोपांमुळे सहा डॉक्टरांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैविकचे वडील, अविनाश आघाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० एप्रिल रोजी त्यांच्या मुलाला गुप्तांगावरील त्रासासाठी वेदांत बाल रुग्णालयात नेण्यात आले. फायमोसीस विथ पिनाइल टॉर्शन या किरकोळ आजारासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन सुचवले. २६ एप्रिल रोजी सकाळी ऑपरेशन करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी सुरुवातीला २०-२५ मिनिटांत होणाऱ्या या ऑपरेशनसाठी चुकीच्या पद्धतीने भूल दिल्याने आणि त्यानंतर वेळीच योग्य उपचार न दिल्याने परिस्थिती बिघडली.
ऑपरेशननंतर डॉक्टरांनी १० दिवस पालकांना चुकीची माहिती देत दैविक शुद्धीवर येईल असे सांगितले. अखेर, ६ मे २०२४ रोजी दैविकचा मृत्यू झाला. उच्चस्तरीय समितीने या प्रकरणाची चौकशी करताना उपचार कागदपत्रे गायब आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचा अहवाल दिला आहे. तसेच ऑपरेशनदरम्यान दिलेल्या तीन इंजेक्शनचा तपशीलही कागदपत्रांमध्ये नाही.
या प्रकरणी डॉ. अर्जुन पवार, डॉ. शेख मोहंमद इलियास, डॉ. अजय काळे, डॉ. अभिजित देशमुख, डॉ. तुषार चव्हाण आणि डॉ. नितीन आधाने यांच्या विरोधात फसवणूक, पुरावा नष्ट करणे आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर मोठा प्रश्न उपस्थित केला असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*