नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्गावर बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) पदाधिकाऱ्यांच्या कारने कंटेनरला मागून धडक दिल्याने या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
सचिन सुभाष बनसोडे (रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) आणि प्रशांत सुनील निकाळजे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर बसपाच्या मुंबईतील कार्यालयात आयोजित समीक्षा बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरहून पदाधिकारी रवाना झाले होते. मंगळवारी संध्याकाळी बैठक संपल्यानंतर पदाधिकारी समृद्धी महामार्गावरून परतत असताना, एक्सएल सिक्स (एमएच २० जीक्यू ८५१५) गाडीने कंटेनरला (एचआर ३८ एसी ३०९५) मागून जोरदार धडक दिली. अपघातामुळे गाडीचा समोरील भाग पूर्णतः चिरडला गेला.
गाडीतील शुभम दसारे, सचिन साळवे, शुभम दांडगे आणि अनिल मनोहर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कंटेनरचा चालक सिंदखेड राजा येथे पकडला:
अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेला होता. घटनास्थळावर सापडलेल्या नंबर प्लेटच्या आधारे कंटेनरचा शोध घेण्यात आला. वावी पोलीस ठाण्याचे अधिकारी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील टीमने सिंदखेड राजा येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने कंटेनर पकडला. कंटेनरचालक महामार्गाच्या कडेला स्वयंपाक करताना आढळून आला.
पोलीस तपास सुरू:
या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*