वैजापूर: पालखेड शिवारातील गट क्रमांक १०३ मधील शेतवस्तीवर अज्ञात तीन दरोडेखोरांनी गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास हल्ला करत वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तुकाराम गंगाधर मोकाटे (६५) व भामाबाई तुकाराम मोकाटे (६०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या घरातील ४० हजार रुपये किमतीचे दागिने लुटण्यात आले.
तुकाराम मोकाटे हे आपल्या पत्नीसमवेत पालखेड शिवारात शेतवस्तीवर राहतात. गुरुवारी मध्यरात्री तीन दरोडेखोरांनी घराच्या मागील दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण केली. भामाबाई मोकाटे यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले व घरातील इतर दागिन्यांसह ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या मारहाणीमुळे घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. वृद्ध दाम्पत्याच्या आरडाओरडीनंतर शेजारी आणि नातेवाईक घटनास्थळी धावून आले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.
यानंतर दोन्ही जखमींना तात्काळ वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे आणि हेडकॉन्स्टेबल रावसाहेब रावते यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपासात चोरट्यांनी परिसरातील डीपीवरील वीजपुरवठा खंडित केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घटनेमुळे पालखेड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत दरोडेखोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*