पैठण : भरधाव वेगात असलेल्या कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चुलती ठार, तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २८ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील ढोरकीन येथील कारकीन फाटा चौफुलीवर घडली.
या अपघातात कडूबाई जगन्नाथ नारळे (वय ६५, रा. कारकीन, ता. पैठण) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा पुतण्या शिवाजी पंढरीनाथ नारळे (वय २३, रा. कारकीन) हा गंभीर जखमी झाला आहे.
शिवाजी नारळे हे त्यांच्या चुलती कडूबाई यांना दुचाकीवरून (एमएच २० एफई २५७७) घेऊन ढोरकीनकडून कारकीनकडे जात असताना कारकीन फाटा चौफुलीवर भरधाव येणाऱ्या कारने (एमएच १२ एसएल ८३७४) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कडूबाई नारळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवाजी नारळे यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसीचे सपोनि ईश्वर जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमी व मृत व्यक्तींना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. कडूबाई नारळे यांच्यावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी कारकीन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कडूबाई नारळे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, गंभीर जखमी शिवाजी नारळे यांच्यावर बिडकीन येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची नोंद पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघातग्रस्त कार व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*