छत्रपती संभाजीनगर: ७५ वर्षीय वृद्धाची पोलिस असल्याची बतावणी करत फसवणूक केल्याची घटना सावंगी बायपास रोडवर घडली आहे. तोतया पोलिसाने वृद्धाला हातचलाखीने १ लाख १६ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. हा प्रकार ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडला.
काय घडले नेमके?
विजयसिंग गुंडीराम सिंगल (वय ७५, रा. हनुमान चौक, चिकलठाणा) यांच्याकडे मोठी क्रेन मशीन आहे, जी सावंगी बायपास रोडवरील गॅरेजजवळ उभी असते. नेहमीप्रमाणे विजयसिंग याठिकाणी होते, तेव्हा एका व्यक्तीने त्यांना दुचाकीजवळ बोलावून नेले. दुचाकीस्वाराने स्वत:ला पोलिस असल्याचे सांगितले आणि परिसरातील मर्डर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
दागिन्यांची तपासणीच्या नावाखाली फसवणूक
तोतयाने विजयसिंग यांच्या हातातील अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याची साखळी काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. विश्वासाने विजयसिंग यांनी त्याचे म्हणणे मान्य केले. हातचलाखी करत तोतयाने साखळी लंपास केली आणि रुमाल परत देत तेथून दुचाकीवरून पसार झाला.
विजयसिंग यांनी रुमाल उघडून पाहिले असता सोन्याची साखळी गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सावध राहण्याचे आवाहन
या घटनेनंतर नागरिकांनी अशा प्रकारच्या तोतया पोलिसांपासून सावध राहावे, तसेच कोणत्याही संशयास्पद व्यक्तीकडे दागिने किंवा अन्य मौल्यवान वस्तू सुपूर्द करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*