परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर आंबेडकरी अनुयायांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. संविधानाच्या प्रतीची विटंबना प्रकरणात झालेल्या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सूर्यवंशी यांचा काल (15 डिसेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायांकडून करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची 10 डिसेंबर रोजी एका माथेफिरूने विटंबना केली होती. या घटनेचा निषेध म्हणून 11 डिसेंबरला आंबेडकरी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. याच प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती. 14 डिसेंबरला त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मात्र, 15 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोस्टमॉर्टमवर वाद
सूर्यवंशी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, तसेच पोस्टमॉर्टम फॉरेन्सिक विभागाच्या देखरेखीखाली व्हावे आणि त्याचे चित्रीकरण केले जावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
आंबेडकरी समाजाचा महाराष्ट्र बंद
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आंबेडकरी समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परभणी शहरात बंद पाळण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
न्यायालयीन कोठडीत मृत्यूवर संशय
पोलिसांच्या दाव्यानुसार सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे. मात्र, न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम केल्याशिवाय सत्य समोर येणार नाही, असे आंबेडकरी समाजाचे नेते म्हणत आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष आता पोस्टमॉर्टम अहवालाकडे लागले आहे. या प्रकरणावर पुढील कारवाईतून न्याय मिळण्याची अपेक्षा सर्वजण करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*