छत्रपती संभाजीनगर: विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी उघडलेल्या बँक खात्यातून तब्बल २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपये वळते करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. आरोपी हर्षकुमार क्षीरसागर आणि यशोदा शेट्टीसह तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आली आहे.
कसा केला घोटाळा?
क्रीडा अधिकारी तेजस कलकर्णी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेत खाते उघडण्यात आले होते. खाते व्यवहारासाठी उपसंचालकांच्या सहीने धनादेश वापरण्यात येत असे. मात्र, कंत्राटी कर्मचारी हर्षकुमार क्षीरसागरने बँकेला बनावट पत्र पाठवून खात्याशी स्वतःचा मोबाइल नंबर जोडला. त्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून मोठ्या प्रमाणावर पैसे स्वतःच्या खात्यात वळते केले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गैरवापर
दिशा फॅसिलिटीज आणि वेब मल्टिसर्व्हिसेस या कंपन्यांद्वारे नियुक्त करण्यात आलेले हर्षकुमार क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी लेखा लिपिक म्हणून काम करत होते. बँक व्यवहार, कॅशबुक नोंदी आणि स्टेटमेंट बदलून त्यांनी मोठा घोटाळा केला.
२१ कोटींचा अपहार
तपासात आढळून आले की, २०२३ पासून बँक खात्यात ५९ कोटी ७ लाख ८२ हजार रुपये जमा झाले होते. यातील २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपये क्षीरसागरने १ जुलै ते ७ डिसेंबरदरम्यान स्वतःच्या खात्यात वळते केले. यातील अडीच लाख रुपये यशोदा शेट्टीच्या खात्यात, तर १ कोटी ६९ लाख ५० हजार रुपये तिच्या नवऱ्याच्या खात्यात पाठविण्यात आले.
क्रीडा विभागाचे उपसंचालक संजय सबनीस म्हणाले, “खात्याचा व्यवहार धनादेशाद्वारेच होतो. मात्र, ऑनलाइन पद्धतीने पैसे वळते होत असल्याचा संशय आला नाही. मोबाइल क्रमांक बदलल्यामुळे घोटाळा लपून राहिला. बँक स्टेटमेंट तपासल्यानंतरच घोटाळा उघडकीस आला.”
आरोपींवर कारवाई सुरू
आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. आरोपींनी पैसे कशा पद्धतीने वळते केले आणि ते कुठे खर्च केले, याचा शोध घेतला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*