छत्रपती संभाजीनगर: डेक्कन ओडिसी रेल्वेस्थानकात आल्यावर एका अनोळखी तरुणाने थेट इंजिनवर चढून विद्युत तारेला स्पर्श केला, ज्यामुळे तो गंभीर भाजला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी 10.30 वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर घडली. जखमी तरुणाला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डेक्कन ओडिसी रेल्वे 50 विदेशी पर्यटकांसह छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी होती. याच दरम्यान, 30 ते 32 वयोगटातील एका तरुणाने अचानक इंजिनवर चढण्याचा प्रयत्न केला. तो विद्युत तारेला स्पर्श केल्याने गंभीर भाजला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवले.
मनोरुग्ण असण्याची शक्यता
रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुण मनोरुग्ण असण्याची शक्यता आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. ओळख पटल्यानंतर या घटनेमागचे नेमके कारण समोर येईल, असे सुरक्षा दलाने सांगितले.
रेल्वेस्थानकावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेने रेल्वेस्थानकावरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुढील तपास रेल्वे सुरक्षा दल करत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*