पंजाबमधील फिरोजपुर येथे गुरुद्वाराजवळ घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील शस्त्रधारी आरोपींना अखेर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या ऑपरेशनमध्ये पंजाब पोलिसांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आरोपींचा नांदेडपासून पाठलाग करून, समृद्धी महामार्गावरील एका बोगद्यात विशेष ऑपरेशन राबवून त्यांना पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवींदर सिंग उर्फ रवी, सुखचेन सिंग, अक्षय कुमार उर्फ बच्चा, दलेर सिंग, गुरप्रीत सिंग आणि प्रिन्स यांचा समावेश आहे.
या विशेष ऑपरेशनमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील १० अधिकारी आणि ४० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पहाटे तीन वाजल्यापासून या कारवाईची तयारी सुरू करण्यात आली होती. बुलेटप्रूफ जॅकेट आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला. आरोपींची इनोव्हा कार डिझेल भरण्यासाठी थांबली असताना, ही कार शिर्डीकडे मार्गस्थ होताच पोलिसांनी बोगद्यात त्यांना अडवून पकडले. या मोहीमेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
हत्याकांडाची पार्श्वभूमी:
फिरोजपुर येथील अकालगड साहेब गुरुद्वाराजवळ घडलेल्या या भीषण हत्याकांडात एक कारवर केलेल्या बेधडक गोळीबारात जसप्रीत कौर (२२), दिलीप सिंग (३२) आणि आकाशदीप सिंग या तिघांचा खून करण्यात आला होता. आरोपींनी केलेल्या गोळीबारात मृतांच्या अंगावर जवळपास ५० गोळ्या लागल्याचे आढळले होते.
या हत्याकांडानंतर आरोपी पंजाबमधून पळून गेले होते, परंतु छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन अखेर त्यांना अटक करण्यात यश मिळवले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*