वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो शुभक्षण आला आहे! आज सुखकर्ता व दुखहर्ता श्रीगणरायाचे शहरात आगमन होत आहे. श्री गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर शहरातील घराघरात तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरवासीयांनी सजावटीसाठी आणि पूजेच्या तयारीसाठी जय्यत तयारी केली आहे.
शहरातील बाजारपेठांमध्ये मूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य आणि रेडिमेड मोदक खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः गजानन महाराज मंदिर रस्त्यावर मूर्ती विक्रीचे सर्वाधिक स्टॉल लावण्यात आले असून, येथे सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. याशिवाय जिल्हा परिषद मैदान, औरंगपुरा भाजी मंडई परिसर, टीव्ही सेंटर, सिडको अविष्कार कॉलनी रोड, मुकुंदवाडी, चिकलठाणा आणि बन्सीलालनगर या परिसरांमध्येही मूर्ती खरेदीसाठी भाविकांची वर्दळ होती.
आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस काही मिनिटांसाठी झाला, ज्यामुळे वातावरण अधिक आल्हाददायक झाले.
गेल्या काही महिन्यांपासून जायकवाडी धरणात पाण्याची पातळी केवळ ४ टक्क्यांवर होती. मात्र, गणरायाच्या आगमनापूर्वीच धरण ९५ टक्के भरले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला असून, बाजारपेठांमध्ये सजावटीचे साहित्य, विद्युतमाळा, पूजेचे साहित्य आणि रेडिमेड प्रसाद खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
श्री गणरायाच्या आगमनामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे, आणि गणेशभक्त या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*