मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ‘चलो ॲप’च्या राष्ट्रीय सामान्य मोबिलिटी कार्डचे (NCMC) अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचीही उपस्थिती होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे NCMC कार्ड छत्रपती संभाजीनगरमध्ये सार्वजनिक वाहतुकीला अधिक सुलभ, कॅशलेस आणि आधुनिक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्डचा वापर शहरातील स्मार्ट बसेस व्यतिरिक्त रेल्वे, मेट्रो, रेस्टॉरंट्स आणि इतर विविध ठिकाणी करता येणार आहे.
हे प्रीपेड कार्ड शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि स्मार्ट सिटी बसच्या कंडक्टरकडे उपलब्ध असेल. एनसीएमसी तंत्रज्ञानासाठी चलो मोबिलिटी कंपनीने तांत्रिक सहकार्य केले आहे. चलो मोबिलिटीने यापूर्वीच मुंबई, नागपूर, जम्मू यांसारख्या ६० पेक्षा जास्त शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे डिजिटलीकरण यशस्वीपणे केले आहे, आणि आता हे तंत्रज्ञान छत्रपती संभाजीनगरमध्येही उपलब्ध झाले आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २५% प्रवास कॅशलेस पद्धतीने केला जातो. या उपक्रमामुळे कॅशलेस प्रवासाचे प्रमाण वाढेल, असा विश्वास स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
NCMC तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना मिळणार कॅशलेस प्रवासाचा अनुभव
“एनसीएमसी आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि कॅशलेस प्रवासाचा अनुभव मिळेल. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल,” असे मत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*