exam-paper-evaluation-honorarium-increase-maharashtra
छत्रपती संभाजीनगर: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वर्षांनंतर दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत या मानधनात कोणतीही वाढ झाली नव्हती, मात्र या वर्षी उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्रति उत्तरपत्रिका दीड रुपया वाढवण्यात आला आहे. तसेच मुख्य नियामकांच्या मानधनात तब्बल २५ टक्के म्हणजे १,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
बारावी परीक्षेसाठी वरिष्ठ परीक्षक व नियामक यांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी तीन तासांच्या उत्तरपत्रिकेसाठी २ रुपये ५० पैसे, अडीच तासांच्या उत्तरपत्रिकेसाठी २ रुपये २५ पैसे आणि १ तासाच्या उत्तरपत्रिकेसाठी २ रुपये मानधन मिळेल. मुख्य नियामकांचे मानधन पूर्वी ३,००० रुपये होते, ते आता ४,००० रुपये करण्यात आले आहे.
दहावी परीक्षेसाठी वरिष्ठ परीक्षक आणि नियामकांना तीन तासांच्या उत्तरपत्रिकेसाठी २ रुपये २५ पैसे, अडीच तासांच्या उत्तरपत्रिकेसाठी २ रुपये आणि १ तासाच्या उत्तरपत्रिकेसाठी १ रुपया ७५ पैसे मानधन मिळेल.
शिक्षक संघटनांनी पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडे मानधनवाढीची मागणी केली होती. अखेर शिक्षण मंडळाने शिक्षकांच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत ही वाढ जाहीर केली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे १०,००० शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीचे काम करतात. शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, भविष्यात अजूनही मानधन वाढ व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*