मराठवाड्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरण, जे मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे मुख्य धरण ९९.५० टक्के भरले आहे. हे धरण लवकरच १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणामधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले होते आणि ९,८०० क्युसेक क्षमतेने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. आता पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नदीकाठच्या नागरिकांना संभाव्य पूरस्थितीबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागात, विशेषतः वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे धरण लवकरच १०० टक्के भरण्याची शक्यता आहे आणि पाण्याचा विसर्ग करण्याची गरज भासणार आहे.
हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने मराठवाड्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच, लातूर, बीड, आणि नांदेड जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*