गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज महानगर : बजाजनगर येथील नव्याने सुरू झालेल्या बियर बार आणि परमिट रूममुळे परिसरातील महिला आणि मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपींच्या असभ्य वर्तनाचा विरोध करत संतप्त महिलांनी गुरुवारी (ता. 20) या दुकानाच्या नामफलकाला काळे फासले.
बजाजनगरमधील एक्स-147 दिशा कॉम्प्लेक्स, इंद्रप्रस्थ कॉलनी येथे काही दिवसांपूर्वी बियर बार आणि परमिट रूम सुरू झाले. नागरी वसाहतीत मद्यविक्री सुरू झाल्यामुळे रहिवाशांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. दारूच्या दुकानामुळे परिसरातील वातावरण बिघडत असून, महिलांवर असभ्य शेरेबाजी, विचित्र हावभाव आणि शिवीगाळ यांसारखे प्रकार वाढले आहेत. विशेषतः तरुण मंडळी कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, गाड्यांचा वेग वाढवणे यासारख्या कृतींद्वारे महिलांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.
परिसरातील महिलांनी या विरोधात आवाज उठवत जिल्हाधिकाऱ्यांकडे दुकान बंद करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे गुरुवारी महिलांनी थेट दुकानाच्या फलकावर काळे फासून आपला रोष व्यक्त केला.
“रहिवासी भागात दारूचे दुकान नको” अशी त्यांची ठाम मागणी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी या महिलांची मागणी आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*