छत्रपती संभाजीनगर : शहरातील पोलिस आयुक्तालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याची तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवारी (दि. २०) छापा टाकला. मात्र, संशयिताने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नसल्याने ही कारवाई निष्फळ ठरली आणि ACB पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले.
गुप्त मोहिमेत ACB अधिकारी आयुक्तालयात दाखल
गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ACB अधिकारी वेषांतर करून आयुक्तालयात पोहोचले. त्यांच्या अचानक आगमनाने पोलिस दलात खळबळ उडाली. काहींनी त्यांना ओळखले, तर काहींनी हा सापळा नेमका कुणासाठी आहे, याचा अंदाज लावण्यास सुरुवात केली. काही कर्मचारी या घडामोडींवर नजर ठेवत होते, तर काहींनी तिथून निघण्याचाच मार्ग धरला.
लाच घेतली नाही, सापळा निष्फळ ठरला
ACB पथकाने संशयित कर्मचाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवले होते. मात्र, तक्रारदाराकडून अपेक्षित लाच घेतली गेली नाही. त्यामुळे कोणतीही ठोस कारवाई न करता पथकाला परतावे लागले. या घटनेची माहिती संपूर्ण आयुक्तालयात वेगाने पसरली आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली.
अधिकाऱ्यांकडून मौन; ACB कडूनही अधिकृत प्रतिक्रिया नाही
यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी ACB पथकाच्या कारवाईला दुजोरा दिला. मात्र, अधिक तपशील देण्यास टाळाटाळ केली. ACB च्या अधिकाऱ्यांनीही या मोहिमेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. दरम्यान, हा सापळा अपयशी ठरल्याने संबंधित कर्मचाऱ्याने मोठा दिलासा घेतला असला, तरी भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांची शक्यता नाकारता येत नाही.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*