छत्रपती संभाजीनगर: नारेगाव येथील एका गोदामाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची तीव्रता लक्षात घेता चिकलठाणा, सिडको, एन-९ आणि पदमपुरा येथून अग्निशमन विभागाचे चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी रात्री ३ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
मध्यरात्री आगीचा तांडव
अग्निशमन विभागाला मध्यरात्री १२:१० वाजता गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली. उपअग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, ड्यूटी इन्चार्ज सोमीनाथ भोसले यांच्यासह फायरमन शुभम शिरखे, साळुंके, आराख आणि विनोद तुपे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाईला सुरुवात केली.
लाकडांचे व पुठ्ठ्यांचे गोदाम जळाले
गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडे, पुठ्ठे आणि बाटल्यांचा साठा होता, ज्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाने मोठ्या प्रमाणात पाणी फवारणी केली. आगीमुळे मोठे नुकसान झाले असले तरी, वेळेवर हस्तक्षेप केल्याने आग अधिक पसरली नाही.
नुकसानीचा आढावा सुरू
या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा आढावा घेतला जात आहे. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित विभागाने अधिक तपास सुरू केला आहे.
गोदाम क्षेत्रांमध्ये सुरक्षा उपाययोजना बळकट करण्याचे आणि अशा घटना टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*