खंडाळा (ता. वैजापूर) येथे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून उपसरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे बागुल (उपसरपंच), मोबीन आणि सादिक (ग्रामपंचायत सदस्य) अशी आहेत.
खंडाळा गावातील तक्रारदार आणि त्यांच्या भागीदारांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विभागीय कार्यालयाकडून पेट्रोल पंप सुरू करण्याची मंजुरी मिळाली होती. मात्र, पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. तक्रारदाराने यासाठी खंडाळा ग्रामविकास अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नव्हता.
२२ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराने उपसरपंच बागुल यांची भेट घेतली. यावेळी बागुल यांनी “ना-हरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाख रुपये लागतील. हे पैसे सर्व सदस्यांना वाटले जातील,” असे सांगितले.
तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दाखल केली. २६ नोव्हेंबर रोजी पथकाने तक्रारदाराला व्हॉइस रेकॉर्डरसह आरोपींच्या भेटीला पाठवले. तडजोडीनंतर उपसरपंच बागुल आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अडीच लाख रुपये मागणी केली. मात्र, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने आरोपींनी पुढील संपर्क केला नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तक्रारदाराकडील रेकॉर्डिंग तपासले आणि प्राथमिक चौकशीत आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. उपसरपंच बागुल, मोबीन आणि सादिक या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वैजापूर पोलिस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*