पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असलेला वाल्मीक कराड याने अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. सध्या सीआयडीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली होती. निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर कराड याने आत्मसमर्पण केले आहे.
व्हिडिओद्वारे केली होती आत्मसमर्पणाची घोषणा
मंगळवारी सकाळी वाल्मीक कराड याने एका व्हिडिओद्वारे आपण पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण जाणार असल्याचे जाहीर केले होते. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला,
“माझ्याविरोधात बीडच्या केज पोलिस ठाण्यात खोट्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी तपासाला सहकार्य करण्यासाठी सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे. राजकीय कटकारस्थानामुळे माझे नाव या प्रकरणात जोडले जात आहे. मात्र, तपासात दोषी आढळलो, तर मी न्यायालयीन शिक्षेला सामोरे जाण्यास तयार आहे.”
जितेंद्र आव्हाडांचा दावा खरा ठरला
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारीच वाल्मीक कराड आत्मसमर्पण करणार असल्याचा दावा केला होता. त्यांना ही माहिती कराड यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
पुढील चौकशी महत्त्वाची
या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडून सुरू असून कराड याच्या चौकशीतून महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*