शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मनपा प्रशासकांनी जपानच्या धर्तीवर एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ करतील, अशी घोषणा मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केली आहे.
स्वच्छतेमध्ये देशात छत्रपती संभाजीनगर शहराचा क्रमांक २३ वा आहे. मात्र, या क्रमांकात सुधारणा करण्यासाठी आणि टॉप टेनमध्ये स्थान मिळवण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. १ ते १५ ऑगस्टदरम्यान महास्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये स्वच्छता उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनपा लवकरच सर्व शाळांना याबाबत पत्र पाठवणार असून, शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्येही हा उपक्रम हाती घेतला जाईल. शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणावे आणि त्यांच्या मनात स्वच्छतेची सवय रुजावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
जी. श्रीकांत यांनी सांगितले की, “शहरातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेचा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जपानमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे महत्त्व शिकवले जाते, त्याचप्रमाणे आपल्या शहरातील विद्यार्थ्यांनाही स्वच्छतेच्या या धड्याने प्रेरित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*