जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना
जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींचे समुपदेशन करणे आणि त्यांना सुरक्षितता आणि तक्रार प्रक्रियेबाबत जागरूक करणे आवश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी दिले. शाळांच्या दर्शनी भागामध्ये तक्रारपेटी आणि संबंधित पोलिस स्टेशन तसेच पोलिस अधिकाऱ्यांचे फोन नंबर दर्शविणारी पाटी लावावी, तसेच ११२ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी निर्देश दिले.
बदलापूर आणि इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी, उच्चशिक्षण विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन, शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी मुलींनी केलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व यंत्रणांनी संवेदनशीलपणे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच, शाळांमध्ये “पोलिस दीदी” आणि “पोलिस काका” या उपक्रमांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. मुला-मुलींना गुड टच, बॅड टचबाबत प्रशिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये वेळोवेळी भेटी देण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात ‘सखी सावित्री समिती’ कार्यान्वित करण्याचे निर्देशही दिले गेले. या बैठकीत शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, सहाय्यक शिक्षण उपसंचालक रवींद्र वाणी, आणि प्रशासन अधिकारी वनिता सांजेकर यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*